Rajmata Satwashila

सावंतवाडी संस्थानच्या राजमाता सत्वशिला देवी अनंतात विलीन

सिंधुदुर्ग : सावंतवाडी संस्थानच्या राजमाता तथा सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्वस्त राजमाता सत्वशिलादेवी यांच्यावर आज सावंतवाडी येथील माठेवाडा स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्षा अन्नपुर्णा कोरगावकर, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार सतीश कदम, पोलीस निरीक्षक सुनील धनावडे ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर, मंगेळ तळवणेकर, संजू परब यांच्यासह राज कुटुंबातील सदस्य व सावंतवाडीतील संस्थान प्रेमी जनता हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.केसरकर व जिल्हाधिकारी डॉ.पांढरपट्टे व जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. गेडाम यांनी शासनातर्फे राजमाता सत्वशिलादेवी यांना पुष्पचक्र अर्पण केले तर जिल्हा पोलीस पथकाने मानवंदना दिली. बुधवार दि. 18 जुलै 2018 रोजी रात्री 9.15 वा. त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 83 वर्षांच्या होत्या. त्यांचे पार्थिव आज 4 वाजेपर्यंत राजवाड्यात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. राजवाडा ते चितारआळी व चितारआळी ते माठेवाडा अशी त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.

बडोदा राजघराण्यातील सयाजीराव गायकवाड यांच्या पणती व प्रतापसिंह गायकवाड व शांतादेवीसाहेब यांची तिसरी राजकन्या म्हणजे सरलाराजे गायकवाड. 8 मे 1951 रोजी सावंतवाडी संस्थानचे राजे शिवरामराजे भोसले यांच्याशी त्यांचा विवाह झाला. संस्थानच्या राणी सत्वशिलादेवी म्हणून त्यांनी सावंतवाडी संस्थानात प्रवेश केला. नंतरच्या काळात कौटुंबिक वातावरणाबरोबरच सामाजिक कार्यातही त्यांनी स्वतःला वाहून घेतले. बापूसाहेब महाराजांनी सुरू केलेल्या राणी जानकीबाई सुतिकागृह संस्थेच्या त्या अध्यक्ष झाल्या व त्यांची सामाजिक कारकिर्द सुरू झाली. 17 ऑक्टोबर 1952 रोजी राजकन्या शिवप्रियादेवी यांचा तर 19 मार्च 1958 रोजी खेमसावंत उर्फ बाळराजे यांचा जन्म झाला. बाळराजे शिक्षणासाठी बेळगाव येत राहिले. याकाळात सत्वशिलादेवी यांचेही वास्तव्य हिडलगा बेळगाव येथे होते. याच काळात शिवरामराजे भोसले हे राजकारणात सक्रिय झाले. त्यामुळे मुलांची जबाबदारी त्यांच्यावर आली. 6 ऑगस्ट 1961 साली त्यांच्या सासूबाई राजमाता पार्वतीदेवी यांचे निधन झाले. त्यामुळे संपूर्ण राजकुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. 1967 साली शिवरामराजे भोसले सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून निवडून आल्यानंतर त्यांचे सावंतवाडीतील वास्तव्य वाढले. त्यांचा जनसंपर्कही वाढला. शिवरामराजे भोसले यांना त्यांनी भक्कम साथ दिली. तसेच संस्थानच्या गंजिफा कलेला ऊर्जितावस्था प्राप्त करुन देण्यासाठी सावंतवाडी लॅकर वेअर संस्थेची स्थापना केली. महिलांचा आर्थिक विकास व्हावा यासाठी महिला औद्योगिक सहकारी संस्थेची स्थापना केली.

शिवरामराजे भोसले 1980 ते 1989 पर्यंत आमदार असताना दक्षिण रत्नागिरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्षा म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. संस्थेच्या श्री पंचम खेमराज महाविद्यालयामार्फत गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी हातभार लावला. 13 जुलै 1995 रोजी शिवरामराजे भोसले यांचे निधन झाले. त्यामुळे दक्षिण रत्नागिरी शिक्षण प्रसारक मंडळाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. त्यांनी मोठ्या धैर्याने ही जबाबदारी पेलली. शिक्षण प्रसारक मंडळाची धुरा सांभाळताना त्यांनी श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये अनेक अभ्यासक्रम सुरू केले. विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षण मिळावे यासाठी क्वीन्स इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली. विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन महाविद्यालयाच्या आवारात दोन नव्या इमारती उभारल्या. गरीब व होतकरु विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी त्यांना मदतीचा हात दिला. राजमाता सत्वशिलादेवी या हस्तकला व चित्रकलेतही पारंगत होत्या. राजवाड्यातील गंजिफा कलेला सातासमुद्रापार पोहोचवण्यासाठी त्यांनी मोलाचे प्रयत्न केले. त्यात त्यांना यशही आले. सावंतवाडी तालुक्यातील विविध सामाजिक उपक्रमातही त्यांचा सक्रीय सहभाग होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © 2018 ABNNI TV. All rights reserved."The S Amarsinh Broadcasting News Network & Investigation’s” www.abnnitv.asia web TV is Marathi+ Hindi+ English language web TV Channel. willing to cover all rural Asia. The authors are solely responsible for the content of their news, articles. By publishing an article or case, www.abnnitv.asia or its directors/editors do not endorse the views of the author. The author is solely responsible for any legal action/consequences arising due to and from any article, case, image or any other information submitted by the author to www.abnnitv.asia विविध सदरांत प्रसिध्द झालेला मजकूर ही त्या त्या लेखकाची मते आहेत. त्या मतांशी www.abnnitv.asia सहमत असेलच असे नाही. व्यक्तींची नावे, आकडेवारी , जुने संदर्भ यांच्या अचूकतेसाठी मूळ स्रोतांद्वारे माहिती घेणे योग्य आहे.